16.3 C
New York
Thursday, May 16, 2024

Buy now

दोन – दोन कुटाणे करण्यापेक्षा, दोन साखर कारखाने बरे ; राक्षसभुवनच्या कॉर्नर सभेत महेबुब शेख यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

 

शिरूर कासार / प्रतिनिधी

दोन – दोन कुटाणे करण्यापेक्षा दोन साखर कारखाने बरे अशा शब्दात युवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी टीका करत गत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी घसा कोरडा पडेपर्यंत बजरंग बप्पा सोनवणे हे शेतकरी पुत्र आहेत असे सांगितले तेच पालकमंत्री आज बजरंग सोनवणे हे शेतकरी पुत्र कसे ? असा सवाल उपस्थित करीत कोलांट उड्या मारीत आहेत. यावरून भाजप व पालकमंत्री हे खरे बहुरूपी असल्याची ही टीका त्यांनी केली.

शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत महेबूब शेख हे बोलत होते. यावेळी उमेदवार बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना महेबूब शेख म्हणाले, बजरंग बप्पा सोनवणे हे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसाला योग्य भाव मिळावा. शेतमजुरांच्या व बेकारांच्या हाताला काम मिळावे, म्हणून दोन साखर कारखाने चालवीत होते. मात्र काही नेते हे त्यांच्या वाड-वडीलांनी उभारलेले व चालविलेले साखर कारखाने बंद करून दोन दोन कुटाणे करीत आहेत. अशी टीका केली. बजरंग सोनवणे यांच्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी साखर कारखाने चालवून शेतकऱ्यांच्या उसाला विक्रमी भाव दिला. जे पालकमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांना म्हणायचे की, खोटे बोलण्याची स्पर्था लागली तर खोटं बोलण्याचे ऑस्कर पारितोषिक हे गोपीनाथराव मुंडे हे पटकावतील. अशा शब्दात त्यांना हिणविणारे पालकमंत्री हेच खरे बहुरंगी आहेत. त्यांचा बहुरंगीपणा महाराष्ट्राने नव्हे तर देशाने बघितलाय. अशी टीका केली. बजरंग सोनवणे यांनी उसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला. तर लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील २६ साखर कारखाने चालवले, ते सर्व कारखाने यांनी बंद पाडले.

राज्यातील उद्योगधंदे व व्यापारी हे महाराष्ट्राबाहेर जात आहेत. यावर बोलताना महबूब शेख म्हणाले की, जर उद्योग-धंदे गुजरातला जाणार असतील तर भाजपवाल्यानी मत सुद्धा महाराष्ट्रात मागण्यापेक्षा गुजरातलाच मागावे. अशा शब्दात खिल्ली उडविली. प्रारब्ध व नशीब याची भाषा करणाऱ्या भाजपला जनता त्याची जागा दाखवून देईल. प्रारब्ध आणि नशीब बदलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त जनतेलाच आहे. तो तुम्ही अधिकार सांगणारे कोण ? असा असा सवाल त्यांनी भाजपला केला. त्याचबरोबर भाजपा हा खरा जातीवादी पक्ष असून जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यांचे उमेदवार केवळ त्यांच्या निवडणुकी पुरताच जातीचा वापर करीत आहेत. असा आरोप करीत या देशात सर्व जाती गुण्या गोविंदाने राहत असताना भाजप केवळ जातिवाद निर्माण करीत आहे. परंतु हा देश कुठल्याही व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या इच्छेप्रमाणे चालत नसून भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालत आहे. याचा सार्थ अभिमान असल्याचे मत ही महेबुब शेख यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईल याचाही चांगलाच समाचार घेतला. त्यांनी मी पुन्हा येईल म्हटलं की फौजदाराचा जमादार होतो. अशी खिल्ली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली. बीड जिल्ह्यातील मतदार सुज्ञ असून भुलथापाला बळी पडणारे नाहीत. म्हणून बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित असून आता केवळ त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. असा विश्वास ही शेख यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व सर्व मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या